Powered by Blogger.

Friday 2 June 2023

 

श्रीज्ञानेश्वरी आणि श्रीदासबोध ग्रंथातील गणेशस्तवन

स्वाती हुद्दार

वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संत ज्ञानेश्वर यांची भगवद्गीतेवरील टीका म्हणजे ज्ञानेश्वरी आणि रामदासी संप्रदायाची स्थापना करणाऱ्या समर्थ रामदास स्वामींनी मानवी मनाला उपदेश करण्यासाठी लिहिलेला ग्रंथ म्हणजे दासबोध.
ज्ञानेश्वरीची रचना झाली शके १२१२ म्हणजेच इ. स. १२९० आणि रामदासस्वामींनी दासबोधाची पहिली सहा दशके लिहिली शके १५८१ म्हणजेच इ.स. १६५९ साली.
ज्ञानेश्वरीमध्ये एकूण १८ अध्याय आहेत आणि नऊ हजार तेहतीस ओव्या आहेत.दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत आणि एकूण ७,८०० ओव्या आहेत.
संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थ दीपिका सांगितली आणि सच्चिदानंदबाबांनी ती लिहून घेतली. दासबोधाचेही लिखाण समर्थांचे पट्टशिष्य कल्याणस्वामींनी केले आहे.
ज्ञानेश्वरी नेवास्याला लिहिली गेली आणि दासबोध शिवथरघळीत लिहिला गेला. या दोन्ही ग्रंथांच्या निर्मिती काळामध्ये साधारण ३५०-४०० वर्षांचे अंतर आहे.
ज्ञानेश्वर आणि समर्थ या दोघांच्या काळातली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती अत्यंत भिन्न होती. ज्ञानदेवांच्या काळात यादवांचे राज्य होते. समाज सुखवस्तू होता. आर्थिक संपन्नता होती.परिणामी भेदाभेद अमंगळ माजला होता. कर्मकांडाचे प्राबल्य वाढले होते. समाजातील जातिभेद, उच्च नीच भेद दूर सारून सामाजिक समरसता निर्माण करण्याचे मोठे आव्हान तत्कालिन संतांसमोर होते. त्यासाठी ज्ञानेश्वरांनी स्वतः नाथपंथी असताना सर्वसामान्यांसाठी सोप्या अशा भक्तिमार्गाचा पुरस्कार करीत भागवत धर्माच्या झेंड्याखाली अठरापगड समाज एकत्र आणत वारकरी संप्रदायाचा पाया रचला. पंढरीच्या सावळ्या पांडुरंगाला आराध्य मानत समतेची शिकवण जनामनात रुजवली आणि कर्मावर निष्ठा ठेवण्याची शिकवण देणारे गीतेचे तत्वज्ञान अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या मराठीत सर्वसामान्यांना सांगितले. तेव्हा ज्ञानदेवांचे वय होते अवघे सोळा वर्षांचे.

समर्थांच्या काळातली परिस्थिती अगदी भिन्न होती. सारा मुलूख यवनांच्या अंमलाखाली होता. सारीकडे मोगलाई माजली होती. कुलीन स्त्रिया बाटवल्या जात होत्या. लोक स्वाभिमान विसरले होते. मंदिरे तोडली जात होती. मुर्ती फोडल्या जात होत्या. शुरांनी आपले इमान परकीयांकडे गहाण टाकले होते. सारीकडे अंधकार भरून राहिला होता. अशावेळी समाजमनाला गरज होती रावणासारख्या दुष्टशक्तींवर विजय मिळविणाऱ्या रणकर्कश श्रीरामांची. म्हणून मनाच्या उत्कर्षाकरिता श्रीराम आणि शक्तीच्या उपासनेकरिता हनुमंताच्या उपासनेचा मार्ग समर्थांनी दाखवला आणि रामदासी संप्रदायाच्या माध्यमातून समाजमनाचा निद्रिस्त स्वाभीमान जागृत केला. जयजय रघुवीर समर्थ ही आरोळी दऱ्याखोऱ्यात घुमू लागली. वर्षानुवर्षांच्या पारतंत्र्याने पिचलेल्या मनांना उभारी मिळाली. सर्वसामान्यांना चांगले वाईट, योग्य-अयोग्य काय, याचा उपदेश करण्यासाठी समर्थांनी दासबोध लिहिला, तेव्हा त्यांचे वय होते ५१ वर्षांचे.
ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरची टीका आहे तर दासबोध हा स्वतंत्र ग्रंथ आहे. ज्ञानदेव आणि समर्थ यांचे स्वभावधर्म वेगवेगळे होते.
जैसें शारदीचिये चंद्रकळे । माजि अमृतकण कोंवळे ।ते वेंचिती मनें मवाळें । चकोरतलगें ॥१-५६॥
तियापरी श्रोतां । अनुभवावी हे कथा ।अतिहळुवारपण चित्ता । आणूनियां ॥ ५७ ॥
असे हळूवारपण ज्ञानदेवांच्या ठायी होते. त्यांचे कवित्व, त्यांचे माऊलीपण या ग्रंथात आपल्याला ठायीठायी भेटते.
आधी प्रपंच करावा नेटका किंवा ठकासी व्हावे ठक असा उपदेश करणाऱ्या समर्थांची भाषा रोखठोक आहे.
ज्ञानेश्वरी मराठीच्या सौदर्यस्थळांनी व्यापलेली आहे, दासबोधात मात्र कर्तव्य कठोरता दिसते. भाषेचे लाघव तिथे फारसे सापडत नाही.
ज्ञानेश्वरी आणि दासबोध दोन्ही ग्रंथांचा आरंभ गणेशस्तवनाने झाला आहे.
गणेशवंदन करताना ज्ञानदेव म्हणतात
ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या
जयजय स्वसंवेद्या, आदिरुपा
ओमकार स्वरुप गणेशाला वंदन करून माऊली गणेशाच्या एकेका अवयवाचे ध्यान करतात. तेव्हा जणूकाही शब्द त्यांच्या समोर हात जोडून उभे असावेत, इतके लाघव त्या शब्दांमध्ये भरून राहिलेले भासते.इथे माऊलींनी वेद-उपनिषदांना गणेशरुप कल्पून वंदन केले आहे. म्हणजे शब्दरुप गणेशाची आराधना केली आहे. स्मृती हे श्रीगणेशाचे अवयव कल्पून अठरा पुराणे म्हणजे या गणेशाचे रत्नजडीत अलंकार आहेत आणि शब्दांच्या ताण्याबाण्याने गणपतीचे वस्त्र विणले गेले असल्याचे माऊली सांगतात. योगमार्गी ज्ञानदेवांनी निराकार गणेशतत्वाला शब्द म्हणजेच नादब्रह्म स्वरुपात साकार केले आहे, त्यातून अत्यंत लोभस, सुंदर अशी गणेशमुर्ती माऊली श्रोत्यांच्या डोळ्यासमोर साकार करतात.
काव्यनाटक या कला म्हणजे गणपतीच्या पायातील नुपुरे आहेत, इतकी सुंदर कल्पना केवळ माऊलीच करू जाणोत कारण माऊलींमध्ये तत्ववेत्त्याइतकाच कवीही दडलेला आहे. पुढे गणेशस्वरुपाचे वर्णन करताना माऊली सांगतात व्यासांसारख्यांची बुद्धी म्हणजे गणेशाची मेखला आहे. एवढेच नव्हे तर सहा शास्त्रे म्हणजे गणेशाचे सहा हात आहेत. माऊलींची प्रतिभा पुढे तत्ववेत्त्याच्या भूमिकेत शिरते आणि माऊली गणेशरुपाच्या माध्यमातून सांख्ययोग, बौद्धमत, पातंजलदर्शन, पूर्वमिमांसा, उत्तरमिमांसा स्पष्ट करतात. तेव्हा माऊलींनी साकारलेल्या गणेशमुर्तीसोबतच आपण माऊलींच्या प्रतिभेसमोरही नतमस्तक होतो. ईशावास्य उपनिषद, श्रुतीस्मृती पुराण ही सारी गणेशाची अंगे आहेत, असे सांगताना माऊली श्रोत्यांना गणेश हेच ब्रह्मसुख म्हणजेच सोहम् असल्याच्या अनुभुतीपर्यंत आणून सोडतात.
सारे विश्व व्यापून उरलेला ओमकार म्हणजेच गणेश असल्याचे सांगत अकार चरण युगल । उकार उदर विशाल ।मकार महामंडल । मस्तकाकारें असे वर्णन माऊली करतात आणि अशा गणेशमुर्तीचे ध्यान केल्यानंतर साक्षात शब्दब्रह्म समोर उभे ठाकते.ही अनुभुतीही माऊली सांगतात.मोगऱ्याच्या फुलांनी ठायीठायी लगडलेली मोगऱ्याची वेल जशी मन मोहून घेते तशीच उपमा-उत्प्रेक्षांनी लगडलेले माऊलींचे हे गणेशस्तवन श्रोत्यांना खिळवून ठेवते.
तुकोबारायांनीही त्यांच्या एका अभंगात गणेशाचे वर्णन ओमकारप्रधान असेच केले आहे.

समर्थांनी दासबोधाच्या पहिल्या दशकाच्या पहिल्या समासात श्रोत्यांशी संवाद साधत ग्रंथाचा उद्देश्य सांगितला असून या ग्रंथात कुठले विषय अंतर्भुत आहेत, ते सांगितले आहे.
दुसऱ्या समासात त्यांनी गणेशाला वंदन करताना समर्थ म्हणतात,
ॐ नमोजि गणनायेका । सर्व सिद्धिफळदायेका ।
अज्ञानभ्रांतिछेदका । बोधरूपा
समर्थही गणेशस्तवनाची सुरुवात ज्ञानदेवांप्रमाणे ॐ नमोजि या शब्दांनीच करतात. मात्र पुढे येणारे गणेशाचे वर्णन विघ्नहर्ता, इच्छित फळ देणारा, अज्ञानाचा नाश करणाऱ्या बुद्धीची देवता असलेल्या सगुण गणेशमुर्तीचे आहे. गणेशाच्या कृपेने सारी विघ्ने नष्ट होतात. गणेश म्हणजे भक्तांचे सर्व कोड पुरविणारे माहेर अहे, असेही समर्थ सांगतात. कार्यारंभी तुझे स्तवन केल्याने कार्य सिद्धीस जाते. अशी गणेशस्तुती केल्यानंतर समर्थ गणेशाच्या सगुण रुपाचे वर्णन करतात. पुराणामध्ये नृत्यगणेशाचे वर्णन अनेक ठिकाणी येते. समर्थही इथे गणेशाच्या नृत्यरुपाचे ध्यान करतात.
नृत्यगणेशाचे भव्य-दिव्य रुप, शेंदूरचर्चित विस्तीर्ण भाल, रत्नजडित वस्त्त्रालंकार, कमरेभोवती गुंडाळलेला फणिंद्र, या साऱ्याचे वर्णन करतानाच नृत्य करताना गणेशाच्या पायातील घुंगुरवाळ्याचा लडिवाळ नाद, त्याच्या शुभ्र दंतपंक्ती, चतुर्भुजात धारण केलेले अस्त्र-शस्त्र, आणि गणेशाच्या नृत्याने देवसभेला  शोभा आली असून गणेशाच्या दिव्य वस्त्राची आभा सारीकडे पसरली आहे. असे अत्यंत मोहक वर्णन समर्थांनी केले आहे. देवसभेत नृत्य करणारी गणेशमुर्ती डोळ्यासमोर उभी करण्याची ताकद समर्थांच्या शब्दात आहे.
साऱ्या विद्यांचा आगर असलेल्या मनोरथ पूर्ण करणाऱ्या गणेशाला साष्टांग नमस्कार करून मी परमार्थाची अभिलाषा करतो, असे सांगत समर्थ त्यांचे गणेशस्तवन पूर्ण करतात.
श्रीज्ञानेश्वरी आणि श्रीदासबोध दोन्ही ग्रंथांची सुरुवात गणेशस्तवनाने होत असली तरी माऊलींनी उभे केलेले गणेशरुप स्वसंवेद्य आहे. ओमकार रुप आहे. वेदांनीही 'नेति नेति' म्हणून ज्याचं वर्णन केलं असा निर्गुण निराकार गणेश आहे. तर समर्थांनी साकारलेले गणेशरुप सगुण आहे. तुमच्या माझ्या मनातले ते रुप आहे.
घरोघरी म्हटली जाणारी गणपतीची सुखकर्ता दुखहर्ता ही आरतीही समर्थांचीच आहे. यातला गणेश म्हणजे सांसारिक भक्तांना संकटी पावणारा, निर्वाणी रक्षणारा आहे. गणपतीच्या या आरतीतही समर्थांनी तातातिडिकित तिडिकित नाचे गणपती असे नृत्यगणेशाचेच वर्णन केले आहे. एकूण या आरतीतही गणपतीचे सगुण रुपच समर्थांनी चर्चिले आहे.
समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्येही गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा अशा शब्दात गणेशाची आराधना केली आहे. इथे मात्र समर्थ गणेशाला निर्गुण कल्पितात.
ज्ञानेश्वरी आणि दासबोध दोन्ही ग्रंथातील गणेशवर्णन वाचल्यावर जाणवते की माऊलींचा गणेश शब्दलेणी लेऊन अवतरतो तो आदिरुप आहे आणि समर्थांचा गणेश भक्तप्रतिपालक आहे.
ज्ञानेश्वरी आणि दासबोध दोन्ही ग्रंथातील गणेशरुपासमोर आणि ते साकारणाऱ्या प्रतिभावंत, तत्वज्ञ, अलौकिक संतांसमोर आपण नतमस्तकच होतो.





Tuesday 11 April 2023

 प्रत्येकालाच भेटावा असा बारीशकर

 
©️स्वाती हुद्दार

हां मेरे दोस्त
वही बारिश
वही बारिश जो आसमान से आती है
बूंदों मैं गाती है
पहाड़ों से फिसलती है
नदियों मैं चलती है
नहरों मैं मचलती है
कुंए पोखर से मिलती है
खप्रेलो पर गिरती है
गलियों मैं फिरती है
मोड़ पर संभालती है
फिर आगे निकलती है
वही बारिश

१९९० च्या थोडासा रुमानी हो जाये या सिनेमातला हा संवाद. १९९० चा हा सिनेमा म्हणजे प्रेमाचा त्रिकोण, हिरो-व्हिलन, हाणामारी, फॅमिली ड्रामा या समकालीन पारंपरिक सिनेमाला छेद देणारा. या सगळ्यापेक्षा काहीतरी निराळं पण अगदी सहजपणे सांगणारा कलात्मक सिनेमा. नाना पाटेकर आणि विक्रम गोखलेंशिवाय या सिनेमातले इतर कलावंत हे छोट्या पडद्यावरचे आहेत. मात्र त्यांचा अभिनय बावन्नकशी आहे. हा सिनेमा अमोल पालेकर या सिद्धहस्त दिग्दर्शकाने दिग्दर्शित केला आहे.
तप्त उन्हाळ्यानंतर पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या गावाच्या पार्श्वभुमीवर हे कथानक पुढे सरकत जातं, या सिनेमातली पात्र, यातलं वातावरण, यातले संवाद पाऊस न आल्याची उद्विग्नता चित्रित करत राहतात. पावसाचं न येणं या पूर्ण सिनेमात भरून राहिलं आहे.खरंतरं पाऊस हाच या सिनेमाचा नायक आहे. पावसाभोवतीच याचं कथानक फिरत राहतं. लाजणं-मुरकणं, नटणं-मुरडणं हे बाईपणाचे अलंकार म्हणून मिरवणाऱ्यांपेक्षा वेगळी असलेली प्रौढ कुमारिका बिन्नी आणि तिचा परिवार या कथेच्या केंद्रस्थानी आहे. त्यांच्याभोवतीच ही कथा गुंफली गेली आहे. या घरातले सारेच एकत्र असून एकेकटे आहेत. पत्नी गेल्यामुळे एकटे झालेले वडील. समवयस्क मुलींपेक्षा वेगळी वाट चोखाळलेली आणि त्यामुळे लग्न न झालेली पण विवाहेच्छुक बिनी, स्वतःच तत्वज्ञान घेऊन आणि तेच बरोबर आहे असा आग्रह धरणारा बिनीचा मोठा भाऊ आणि जीवनात काहीतरी करून दाखविण्याची महत्त्वाकांक्षा असलेला परंतु घाबरट आणि वयानुसार एका मुलीशी क्रश असलेला बिन. या साऱ्यांचं एक कुटुंब. तरीही प्रत्येकजण एकटा. प्रत्येकाचं दुःख वेगळं आणि एकटही.
आपण आपल्या मुलांना न्याय दिला नाही, असं दुःख मनात बाळगणारे वडील, प्रत्येकजण चुकीचा आणि आपण आणि आपलं तत्वज्ञानच केवळ बरोबर, असं मानणारा भाऊ, आपल्याला कधीच काही जमू शकणार नाही, असा न्यूनगंड बाळगणारा बिन आणि आपण कधीच कोणाला आवडू शकणार नाही, असे ठरवून टाकलेली बिनी.
या कुटुंबाशिवाय पण याच सगळ्यांच्या स्वभावाशी साधर्म्य असणारा इथला कलेक्टर जे. डी. वाट्याला आलेल्या एकटेपणाचे कौतुक सांगणारा. आपले एकटेपण मिरवणारा.
सिनेमाची सुरुवात होते तिच बिनीच्या वडिलांच्या बिनीएवढ्या मुलीला मुल होणार आहे, यासंदर्भासह. तिथुन लग्नाचे वय होऊनही अजून लग्नाशिवाय असलेल्या बिनीच्या लग्नाची अनाहूत काळजी करणारे एकेक पात्र कथानकात डोकावून जाते. लग्न जुळवणारी एक गावमावशी, रिसेप्शनमध्ये भेटलेल्या बिनीला दीदी म्हणणाऱ्या तिच्याहून लहान मुली, गावातल्या प्रौढ स्त्रिया आपापल्या परीने बिनीला लग्नाविषयी सुचवित असतात.
लग्न करण्याची बिनीलाही आस आहे. पण आपण इतर मुलींसारख्या नाही. अगदी सर्वसामान्य आहोत आणि कोणालाही आवडूच शकत नाही, या न्यूनगंडाने तिला ग्रासले आहे. कलेक्टर जे. डी. तिला आवडतो, पण आपण त्या आवडत नाही, अशी बिनीची ठाम समजूत आहे. अशा प्रत्येकाच्या आपापल्या भावविश्वात जगण्याच्या पार्श्वभुमीवर आहे तिथे पडलेला दुष्काळ.खरेतर दुष्काळ प्रतिकात्मक आहे. या कथेच्या पात्रांच्या मनात आहे. यांच्या मनाची मशागत करण्याची आवश्यकता आहे.
पावसाळ्याचे दिवस उलटून जाताहेत, पाऊस मात्र नाहीच. सगळीकडे न सोसणारा असह्य उष्मा. या सगळ्यांच्या मनातही उलघाल. आपल्याच विचारांची. उकाडा असह्य होतोय, बिनी खिडकी उघडते, सताड. मात्र उलघाल कमी होत नाही. उलट बाहेरच्या गरम वाऱ्याने उकाडा अधिकच वाढतो, बिनीच्या मनातल्या उलघालीला केवळ मनाचे कवाड किलकिले करणे, पुरेसे नाही, याचेच हे निदर्शक. इतके वर्ष काहीच पेरले न गेलेल्या या मनोभुमीत आता काही अंकुरण्यासाठी आवश्यकता आहे, जोरदार सरींची. आणि अशी जादुई बारीश घेऊन येतो बारीशकर.
बिनीच्या जे. डी. विषयीच्या भावना जाणून तिचे वडील त्याला जेवणाचे आमंत्रण द्यायला जातात, जे. डी. येणार म्हणून हरखलेली बिनी साग्रसंगीत सगळी तयारी करते, मात्र जे. डी. बिनला आणि वडिलांना अपमानित करतो. या प्रहाराने हे कुटुंब उद्विग्न झालेलं असतानाच अचानक वीज जातेे. हे वीज जाणं म्हणजे या कुटुंबाच्या मनात पसरलेल्या अंधाराचं द्योतक आहे. आणि त्या अंधारातच घराच्या दारात येतो एक अनाहूत पाहुणा. साऱ्या आशा संपताना आशेचा शेवटचा किरण बनून. दृष्टद्युम्न पद्मनाभ प्रजापती नीलकांत धुमकेतू बारीशकर नावाचा. त्याच्या नावातच पाऊस आहे. पाऊस म्हणजे आशा. सर्जनाची. ताकद जीवन फुलविण्याची. आणि त्याच्या नावात धुमकेतूही आहे, म्हणजे अचानक प्रगट होणारा. आगंतुक. त्याच्या येणे साशंक करणारे आहे. त्याचे बोलणे, त्याचा आविर्भाव, त्याचे पाऊस आणण्याचे आश्वासन सारे खोटे वाटावे असे. बिनीचा आणि मोठ्या भावाचा त्याच्यावर अजिबात विश्वास नाही. बिन मात्र त्याच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवतो. वडिलांचा विश्वास नाही, पण ते त्याला संधी द्यायला तयार आहेत. यातून पुन्हा त्या कुटुंबातील प्रत्येकाचे स्वभाव अधोरेखीत होतात. बिनचा भाबडेपणा, वडलांचा साधेपणा, मोठ्या भावाचा तर्कनिष्ठ स्वभाव आणि बिनीचा कर्तव्यकठोर स्वभाव.
तरीही बारिशकर आपला आग्रह सोडत नाही. आपलं म्हणणं गळी उतरवण्याचा प्रयत्न करतो. आणि बिनीचा भाऊ त्याला ५ हजार रुपये देतो. बारिशकर तिथेच थांबतो आणि प्रत्येकाला वेगळं भेटतो. बिनमधला आत्मविश्वास जागवण्याचा प्रयत्न करतो. त्याचा राग राग करणाऱ्या बिनीच्याही मनाचा तो वेध घेतो. तिला तू सुंदर आहेस, हे अखेर पटवून देतो. ४८ तास होत आले असतात. पाऊस आलेला नसतो, बारीशकर बिनीजवळ कबूल करतो, मी खोटं बोललो, मला नाही पाऊस आणता येत, बिनी म्हणते, मला माहिती आहे. बिनीला बारिशकरमधल्या पाऊस विकणाऱ्यापेक्षा त्याच्यातला स्वप्न विकणारा खरा वाटू लागतो, अधिक भावू लागतो. बारिशकरमुळे बिनीचा आणि बिनचा स्वप्नाकडून सत्याकडे प्रवास सुरू होतो. जी स्वप्न बारिशकरनी त्यांच्यात जागवली असतात. तेवढ्यात गावात एक चोर आला आहे, आणि पोलिस त्याला शोधताहेत, ही बातमी कळते. तू या गावात कायमचा रहा म्हणणारी बिनी बारीशकरला सावध करायला जाते आणि लवकरात लवकर तिथुन निधुन जायला सांगते. डोळ्यात नुकत्याच उमललेल्या स्वप्नांची धुंदी असलेल्या बिनीला बारिशकर सोबत चलण्याविषयी विचारतो, मात्र स्वप्न आणि सत्याच्या हिंदोळ्यावर झुलणारी बिनी बारिशकर सोबत जायला नकार देते. आता तिच्या मनात आनंद उमलला आहे, आणि तो आनंद आता सगळीकडे भरून राहणार आहे. नेहमीसाठी. बारीशकर नसला तरी. बारीशकरचा निरोप घेऊन ती मागे फिरते, मागे तिचा भाऊ, जे. डी आहेत आणि अचानक पावसाचे थेंब पडू लागतात. हळुहळु पावसाची गती वाढते, पावसासाठी आतुरलेला प्रत्येकजण सुखावतो. सृष्टीही श्रांत होते. तप्त धरतीवर पडलेल्या पहिल्या पावसामुळे येणारा मृद्गंध सिनेमातून थेट प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचतो. बारीशकर परत येतो, बिनीच्या भावाने परत घेतलेले पैसे त्याच्या खिशातून काढून घेतो. आपला मेहनताना म्हणून, कारण त्यानं सांगितल्याप्रमाणे ४८ तासांच्या आत पाऊस आलेला असतो. ही बारीशकरचा कमाल की निसर्गाची किमया, याचं उत्तर दिग्दर्शकानं प्रेक्षकांवर सोडलं आहे, मात्र बिनी, बिन यांच्या मनातल्या आनंदाच्या पावसाचं श्रेय मात्र नक्कीच बारीशकरला जातं. हा सिनेमा म्हणजे संगितिका आहे. यातले अनेक संवाद गाण्यातूनच येतात. या सिनेमाला एक लय आहे. गायकाच्या मागे जसा तानपुरा निनादत राहतो, आणि तानपुऱ्याचे स्वर सारं अवकाश व्यापून उरतात, तसा या सिनेमाच्या पार्श्वभुमीला पाऊस निनादत राहतो आणि सिनेमा संपल्यावरही तो आपल्या मनात रेंगाळत राहतो. हा सिनेमा पाहताना राजेश खन्नाचा बावर्ची आठवतो, कुटुंबाची विस्कटलेली घडी नीट करणारा, तसंच अलिकडचा शाहरुखचा डिअर जिंदगीतला मानसोपचारतज्ज्ञ आठवतो.
अमोल पालेकरचा हा सिनेमा एन. रिचर्ड नॅशच्या द रेनमेकर या नाटकावर आधारलेला आहे. मात्र तो साकारला इथल्या संस्कारांचे अंगडे-टोपडे लेऊन. पाश्चात्य उपरेपणा त्यामध्ये कुठेही जाणवत नाही. बारीशकरच्या तोंडी घातलेली कविता तर लाजवाबच.एकूणच हा सिनेमा मनाच्या कोपऱ्यात कायमचा रुतून बसतो. असा मनकवडा बारीशकर प्रत्येकाच्या आयुष्यात यावा, गरज असेल तेव्हा आनंदाच्या पावसाचा वर्षाव करायला, बस, इतकंच, एवढंच.

Friday 31 March 2023

अखंडीत सेवा घडो रामचंद्राची

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे माझ्या बाबांचे (श्री. विजय हरीभाऊ कोठे) सद्गुरू.
बाबांनी आयुष्यभर चांगुलपणाचीच आराधना केली. श्रीराम त्यांच्या आचरणात होते आणि रामनाम त्यांच्या मुखात होते. मेधाविनी मंडळाने रामनवरात्रात राम ध्यावा, राम गावा ही मालिका चालवली. त्यानिमित्ताने ही रामनाम नौका, या माझ्या आवडत्या पदावर काही वेडेवाकुडे लिहण्याचा प्रयत्न केला. ही रामसेवा माझ्या बाबांच्या चरणी समर्पित करते.
स्वाती


ही रामनाम नौका | भवसागरी तराया ||
मद, मोह लोभ सुसरी | किती डंखिती विषारी |
ते दुःख शांतवाया | मांत्रिक रामराया ||
सुटले अफाट वारे | मनतारू त्यात बिथरे |
त्या वादळातुनी या नेईल रामराया ||
भ्रम भोवऱ्यात अडली | नौका परी न बुडली |
धरुनी सुकाणू हाती | बसलेत रामराया ||
आम्ही सर्वही प्रवासी | जाणार दूरदेशी |
तो मार्ग दाखवाया | अधिकारी रामराया ||
हा देह नाशिवंत | जाण्यास ना समर्थ |
तारी तारी रामराया | दीनदास लागे पाया |


निष्पर्ण चाफा पानोपानी बहरू लागला, आंब्याच्या झाडावर कैऱ्या लगडून आल्या, मोगऱ्याच्या सुगंधानं अंगण कोंदू लागलं, कडूलिंबाचा कडवट वास वातावरणात दाटू लागला की चैत्राची चाहूल लागते. आणि या सगळ्या जाणिवांना लगडून येतं गुढीपाडव्यापासून सुरू होणारं रामाचं नवरात्र.
माझ्या लहानपणी रामाच्या नवरात्रात आमच्या वेटाळातल्या माता-भगिनी एकत्र येऊन कोणा एकीच्या घरी सामुहिकपणे रामायण वाचायच्या. घरातली आवरासावर झाली की दुपारी रामायण सुरू व्हायचं.आईबरोबर मीही तिथे जात असे.रामायणाचं वाचनं झालं की त्या साऱ्या मिळून ही रामनाम नौका,भव सागरी तराया हे पद म्हणायच्या.
त्या महिलांमध्ये काही साठी पार केलेल्या होत्या. काही मध्यमवयीन होत्या. काही तरुणी होत्या. त्या सगळ्या सामुहिक स्वरात जेव्हा हे पद गायच्या, तेव्हा दुपार टळत असायची. चैत्रातला उष्मा जाणवत असायचा. रामाच्या फोटोला घातलेला मोगऱ्याचा हार मलूल झालेला असायचा.समोर नंदादीप तेवत असायचा. उदबत्तीच्या सुगंधानं अधिकच भावपूर्ण झालेल्या वातावरणात त्या साऱ्याजणींचा भावविभोर सूर मिसळायचा. या पदाचा भावार्थ कळण्याचं ते वय नव्हतं, मात्र तरीही ते पद, त्याची चाल, त्याची लय मला खूप आवडायची आणि तेव्हापासून श्रीराम माझं आराध्य दैवत झालं. या पदानंतर निराजनं उजळली जायची आणि राम श्रीराम जयराम जयजयराम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम ही आरती सुरू व्हायची. त्या साऱ्या जणींचे ते भक्तिरसात न्हाऊन निघालेले थरथरते स्वर, टाळ्यांच्या आवाजात मिसळलेला त्यांच्या काकणांचा नाद, त्यांची रामशरणता म्हणजे रामभक्तिचा परमोच्च बिंदू. त्यानंतर सुरू होणारी धूप-दीप झाला आता कर्पूर आरती, छत्र सिंहासनी बसले जानकीपती, ही कापुरारती म्हणजे या साऱ्या दैनिक उपासनेचा कळसाध्याय. हे सारं माझ्या मनपटलावर कायमचं कोरलं गेलं आहे.

परमेश्वर भक्तीचे विविध प्रकार आहेत. प्रत्येकजण त्याला मानवेल त्या पद्धतीनं परमेश्वराची उपासना करीत असतो. त्यापैकी योगमार्ग, कर्ममार्ग सामान्यांसाठी कठीण आहे. मात्र ज्ञानेश्वरादी संतांनी सांगितलेला भक्तीमार्ग हा परमेश्वर उपासनेचा सोपा मार्ग आहे. परमेश्वर उपासनेचा त्याहीपेक्षा सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. नामाचं महात्म्य अनेक साधुसंतांनी सांगितलं आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी तर नामस्मरण सुद्धा अत्यंत सोपं करून सांगितलं आहे.
नाम सदा बोलावे, गावे भावे, जनांसी सांगावे
हाचि सुबोध गुरूंचा, नामापरते न सत्य जाणावे

 
हाच भाव ही रामनाम नौका या पदामध्ये आहे.
रामनामाचा महिमा तर अगाध आहे. वाल्याचा वाल्मिकी करण्याचं सामर्थ्य या रामनामात आहे. दगडांना तरंगायला लावून समुद्रावर सेतू निर्माण करण्याची ताकद रामनामात आहे.
बुधकौशिक मुनींनीही रामरक्षेत
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने
असं रामनामाचं महत्त्व सांगितलं आहे.

श्रीराम हे तर भारतीयांचं राष्ट्रदैवत आहे. म्हणूनच आसेतूहिमाचल रामकथा गायली जाते. श्रीराम भारतीयांच्या ह्रदयात आहेत. इथे दोन माणसं एकमेकांना भेटली की राम-राम म्हणतात. माणूस अंतीम प्रवासाला निघाला की रामनामाचा गजर केला जातो. इतकं रामनाम आमच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनात रुजलं आहे.
ही राम नाम नौका या पदातही रामनामाचा महिमा वर्णन केला आहे. माणसाचं मन म्हणजे साऱ्या विकारांचं आगर. विकारांवर विजय मिळवणं सामान्य भक्तांना अशक्य आहे.  मद, मोह, लोभ हे सारे विकार माणसाच्या ठायी आहेतच. परमेश्वरासमोर त्याची कबुली देण्यात काहीही गैर नाही. श्रीराम हे तर त्यांच्या भक्तांसाठी मांत्रिक आहेत आणि रामनाम हे त्या विकारांवरील औषध आहे. या साऱ्या विकारांचं विष उतरविण्याची ताकद रामनामात आहे. कारण श्रीराम हे साऱ्या विकारांपासून दूर आहेत. अयोध्येचा युवराज्याभिषेक होण्याच्या दिवशी वल्कलं परिधान करून १४ वर्ष वनात जावं लागलं, तरीही ते विचलित झाले नाहीत. सोन्याच्या लंकेवर विजय मिळवूनही जननी जन्मभुमीश्च स्वर्गादपि गरीयसी म्हणत ती लंका बिभीषणाला देऊन टाकणाऱ्या श्रीरामांनी मोह-लोभावर विजय मिळवला होता. अशा श्रीरामांचं नाम हे या विकारांवरचं रामबाण औषध आहे.
राम के गुण गुणचिरंतन
राम गुण सुमिरन रतन धन
मनुजता को कर विभूषित
मनुज को धनवान करिये, ध्यान धरिये

श्रीराम म्हणजे गुणांचा समुच्चय. आदर्श पुत्र, आदर्श शिष्य, बंधु, भ्राता, एवढंचं नव्हे तर आदर्श शत्रुही. एकवचनी, एक पत्नी, एक बाणी असलेले, चिरंतन गुणांचा पुतळा असलेले श्रीरामच आमचे नावाडी आहेत आणि त्यांच्या सुमिरनाचं, नामस्मरणाचं रत्न आम्हा भक्तांच्या हाती लागलं आहे.
माणसाच्या आयुष्यात अनेक वादळं येतात. सांसारिक अडचणी येतात. त्या अडचणींना सामोरे जाताना मन विचलित होतं. परमेश्वराचा विसर पडतो, अशावेळी श्रीरामांनी सतत सोबत करावी. त्या चरणयुगलांचा विसर कधीही पडू नये आणि त्या अडचणीरुपी वादळातून श्रीराम कृपेनं बाहेर येता यावं, असं मागणं इथे मागितलं आहे.
समर्थ रामदासस्वामी म्हणतात,
अनुदिन अनुतापे तापलो रामराया
परम दीनदयाळा नीरसी मोहमाया
अचपळ मन माझे, नावरे आवरिता
माणसाचं मन वाऱ्यापेक्षाही वेगानं धावतं. त्याला आवर घालणं कठीण आहे, मात्र सारी सूत्र श्रीरामांच्या हाती सोपवली, तर ते नक्कीच आम्हाला या प्रवाहातून पार नेतील, आवश्यकता आहे, स्वतःला पूर्णपणे त्यांच्यावर सोपवून देण्याची.आमच्या जीवननौकेचं सुकाणू प्रत्यक्ष श्रीरामांनी हाती धरलं आहे. त्यामुळे भ्रमाचे कितीही भोवरे जीवनात आले तरीही ही जीवन नौका बुडण्याची भीती नाही. असा विश्वास या पदात व्यक्त केला आहे आणि तो सार्थ आहे.

तुलसी रामायणात अत्यंत सुंदर प्रसंग आहे. श्रीराम वनात जायला निघाले, तेव्हा त्यांना गंगापार करायची होती. अर्थातच एक नावाडी त्याची नौका घेऊन हजर झाला. तो श्रीरामांचा भक्त होता. नौकेतून गंगापार करवणं हा त्याचा व्यवसाय होता.नावाड्यानी प्रभुंना गंगापार नेलं. वनवासी श्रीरामांजवळ नावाड्याला द्यायला काही नव्हतं. त्यांनी जानकीकडे पाहिलं. सीतामाईनं आपल्या बोटातली अंगठी नावाड्याला देऊ केली. ती घ्यायला नकार देताना नावाड्यानं दिलेलं उत्तर गोस्वामीजींनी अत्यंत भावपूर्ण शब्दात वर्णिलं आहे.
नाई से न नाई लेत, धोबी से न धोबी लेत,
देकर मजूरिया जाति को न बिगाडिये,
प्रभ आये मोरे घाट तो पार मैंने उतार दीने,
जब आऊंगा मैं तोरे घाट तो पार मोहे उतारिये

 
अगदी हाच भाव या पदातही व्यक्त झाला आहे.

आम्ही सर्वही प्रवासी | जाणार दूरदेशी |
तो मार्ग दाखवाया | अधिकारी रामराया

 
हे जग नश्वर आहे, आम्ही सारेच मर्त्य आहोत, हे सत्य सांगतानाच हा जीवनप्रवास संपवून पैलतीराचा मार्ग दाखविण्यास श्रीराम समर्थ आहेत.  हा नाशवंत देह भवपार जाण्यास असमर्थ आहे. त्यामुळे श्रीरामांनी हा देह तारावा आणि हा भवसागर पार व्हावा, हेच मागणं शेवटी मागितलं आहे.
श्रीरामांची कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी अनन्यशरणता पाहिजे. ती असली आणि मुखात रामनाम असलं तर जीवनाचं सोनं होतं आणि जन्म कृतार्थ होतो.
धर्माच्याकरिता आम्हास जगती, रामाने धाडियले
ऐसे जाणूनी रामभक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले
आता धर्मसख्या तुझ्या पुढतीया, नम्रत्वतेने असे
इच्छा हो जसी मानसी करितसे, हा देह तुझा असे

 जय जय रघुवीर समर्थ
(c) स्वाती हुद्दार

Friday 3 June 2022

 त्या दोघी

 
स्वाती हुद्दार

 
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला तो भारत-पाकिस्तान असा विभाजित होऊन. या विभाजनाने अनेक जखमा दिल्या. काही कधीही भरून न येणाऱ्या. भारत स्वतंत्र झाला की जादुची कांडी फिरावी तसे सारे प्रश्न संपतील, भारतात सोन्याचा धुर निघेल, दुधाच्या नद्या वाहतील असे स्वप्नरंजन करणाऱ्यांच्या भ्रमाचे भोपळे फुटले आणि अनेक नवेच प्रश्न देशासमोर उभे ठाकले. भ्रमनिरास झालेली संवेदनशील पिढी आपल्या प्रश्नांची उत्तरे कलांमधून शोधू लागली. आपल्या व्यथा-वेदना कलांमधुन मांडु लागली. यातुनच एक नवा प्रवाह संगीत, नाटक, साहित्य यातुन प्रवाहित झाला. त्यावेळची तरुण भारावलेली पिढी या प्रवाहात सामील झाली आणि कला, साहित्य, संस्कृतीच्या क्षेत्रात क्रांती झाली.
जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
असे म्हणत नवे प्रवाह साऱ्याच क्षेत्रांमधुन दुथडी भरून वाहू लागले. काव्य, कथा, कादंबरी प्रमाणेच रंगभुमीवरही हे नवे बदल दिसू लागले. नाटकाच्या संहितेपासून विषय-आशय ते सादरीकरणापर्यंत साऱ्यातच आमुलाग्र बदल झाले. रात्र-रात्र चालणाऱ्या संगीत नाटकांची जागा आशयप्रधान नाटकांनी घेतली. पौराणिक नाटकांपेक्षा प्रेक्षकांना सामाजिक विषय अधिक खुणावु लागले आणि मन्वंतराच्या या काळातच रंगभुमीला दोन गुणी कलावंत मिळाल्या. त्या दोघी म्हणजे सई परांजपे आणि विजया मेहता.
पुरुषी क्षेत्र समजल्या जाणाऱ्या नाट्य दिग्दर्शनाच्या क्षेत्रात या दोघींनीही आपल्या नावाची मोहोर उमटवली, नव्हे या दोघींनीही आपापले संप्रदाय निर्माण केले. सई आणि विजया नावाचे प्रवाह साधारण ५०-६० च्या दशकापासून अगदी अलिकडेपर्यंत सांस्कृतिक क्षेत्रात समांतर वाहत राहिलेत.
विजया मेहता उर्फ विजया जयवंत यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९३४ चा आणि सई परांजपेंचा जन्म १९ मार्च १९३८ चा. म्हणजे एकाच दशकातला. स्वातंत्र्यपूर्व काळातला.
विजयाबाईंचे बालपण मुंबईतल्या गिरगावात गेले. जयवंत या उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील विजया हे शेंडे फळ. स्वातंत्र्य चळवळीने तेव्हाचे वातावरण भारलेेले होते. त्याचा परिणाम नकळतपणे विजयाबाईंच्याही मनावर होत होता. त्या भारावलेल्या मनोवस्थेत त्याही राष्ट्रसेवादलात सामील झाल्या. शाळा-महाविद्यालयीन शिक्षण सुरूच होते आणि एका वळणावर विजयाबाईंना त्यांच्यातील कलावंताचा शोध लागला. कस्तुरी मृगाला त्याच्यातला सुगंध गवसावा अगदी तसा.
सई परांजपेंची पार्श्वभुमी अतीशय वेगळी होती. श्रेष्ठ गणितज्ज्ञ रॅंगलर परांजपेंची नात. ज्येष्ठ समाजसेविका, केंब्रिज विद्यापीठाच्या अधिस्नातक असलेल्या शकुंतला परांजपेंची आणि रशियन चित्रकार युरा स्लेप्टझॉफ यांची ही लेक. अत्यंत सुसंस्कारित, बौद्धिक, उच्चशिक्षित, व्यासंगी वातावरण सईला बालपणापासूनच मिळाले. आजोबा आणि आईच्या डोळस देखरेखीखाली सईचे व्यक्तिमत्व फुलत होते. वयाच्या आठव्या वर्षीच सईमधल्या कथा लेखिकेचा जन्म झाला. शिक्षण सुरू असतानाच सईचे आकाशवाणीशी बंध जुळले, इंग्रजी वृत्त निवेदिका म्हणून. आणि त्यांचा माध्यमांमधला सूवर्णकाळ सुरू झाला. दूरदर्शन, बालरंगभुमीत रमलेली सई परांजपे नाट्य क्षेत्राचे रितसर शिक्षण घेण्यासाठी दिल्लीच्या नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये दाखल झाली. आणि तिथे तिला भेटले नाट्यक्षेत्रातील पितामह इब्राहिम अल्काजी. आणि मुळच्याच प्रतिभावंत सईच्या कलागुणांना पैलू पडू लागले.
इथे एक योगायोग असा की विजयाबाईंचेही गुरू इब्राहिम अल्काजीच आहेत. अल्काजींच्या तालमीत तयार झाल्यानंतर बाईंच्याही प्रतिभेला बहर आला. पुढे त्यांना आदि मरज़बान आणि जर्मन दिग्दर्शक फ्रिट्ज बेनेविट्ज़ यांचेही मार्गदर्शन लाभले. पीटर ब्रुकला बाई गुरू मानतात. बाईंच्याच शब्दात सांगायचं तर बाई पीटर ब्रुक यांच्याकडून एकलव्यासारख्या शिकल्या.
विजयाबाई आणि सई यांच्यात आणखी एका बाबतीत साम्य आहे, ते म्हणजे दोघीही पितृ प्रेमापासून वंचित राहिल्या. बाईंचे वडिल त्या पाच-सहा वर्षाच्या असताना वारले आणि सईच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला तेव्हा सई दीड वर्षाच्या होत्या. शकुंतला परांजपे सईला घेऊन भारतात परतल्या,त्यामुळे सईचेही बालपण वडिलांविना गेले.
कला क्षेत्रातला दोघींचाही प्रवास वेगळा आहे. अत्यंत देदिप्यमान आहे.क्रांतिकारक आहे.दोघींच्याही स्वभावाला अनुसरुन आहे. त्यांच्या-त्यांच्या प्रकृतीला मानवणारा आहे. अत्यंत लोभस आहे.
१९५१ साली महाविद्यालयातील नाटकांतून विजया मेहता यांच्या नाट्यकारकीर्दीची सुरुवात झाली. अगदी उमेदीच्याच काळात नानासाहेब फाटक, मा. दत्ताराम अशा दिग्गज मंडळींसोबत काम करण्याचा अनुभव त्यांना मिळाला.विजयाबाईंच्या नाट्यदिग्दर्शनाची सुरुवातच विजय तेंडुलकरांच्या श्रीमंत या नाटकाने झाली.त्याचबरोबर विजयाबाई पु. ल. देशपांडेंच्या नाटकांमधुनही काम करीत होत्या. पु.लंच्या नाट्यव्यक्तिमत्त्वाचा खूप प्रभाव बाईंच्या नाट्यप्रवासावर पडला. त्याचवेळी चि. त्र्यं. खानोलकर, दळवी, महेश एलकुंचवार यांच्या नाट्य संहिता विजयाबाईंना भुरळ घालू लागल्या. प्रायोगिक म्हणाव्या अशा नाट्यसंहितांना बाईंनी एकीकडे पाश्चात्य नाट्यकला आणि दुसरीकडे लोककला यांच्या मिश्रणातून तयार झालेला नवाच साज चढवला व त्याचे रुपडेच बदलून टाकले. परिणामी प्रेक्षकांना काहीतरी अगदी नवे, वेगळे, ताजे बघायला मिळाले.
१९६० साली विजयाबाईंनी तेंडुलकर, अरविंद देशपांडे यांच्यासह रंगायन नावाची नाट्यसंस्था सुरू केली आणि प्रस्थापिताला छेद देणारे नवे काहीतरी रंगभुमीवर रंगायला लागले. तुज आहे तुजपाशी, शितू, हॅम्लेट, सुंदर मी होणार यातील अभिनय आणि मादी, अजगर आणि गंधर्व, चिमणीचं घर होतं मेणाचं, गिधाडं, यशोदा, एक शून्य बाजीराव, अजब न्याय वर्तुळाचा, संध्याछाया, जास्वंदी,अखेरचा सवाल,हमीदाबाईची कोठी, बॅरिस्टर, पुरुष,हयवदन, वाडा चिरेबंदी ही आणि अशी अनेक अत्यंत गाजलेली नाटकं विजयाबाईंच्या नावावर आहेत.रंगभूमीवरील अनेक साचेबद्ध गोष्टी हद्दपार करण्याचा आणि जागतिक रंगभूमीचं‌ भान मराठी रंगभूमीला देण्याचा मान विजयाबाईंना जातो. विजयाबाईंनी हयवदन आणि शाकुंतलचे प्रयोग जर्मन भाषेत आणि जर्मन कलावंतांकडून जर्मन प्रेक्षकांसमोर यशस्वीपणे केले, हे विजयाबाईंचे वेगळेपण.
विजयाबाईंच्या काहीशा बोजड, मनोविश्लेषणात्मक, प्रायोगिक नाटकांच्या पार्श्वभुमीवर सई परांजपेंची वाट अगदी निराळी होती. सईची निर्मिती मध्यमवर्गींय मनाला भावणारी, त्यांचीच सुख-दुःख सांगणारी होती. सईचा पिंड मुळचा सिद्धहस्त लेखिकेचा. त्यामुळे त्यांनी प्रचंड साहित्य निर्माण केलं. त्यामध्ये बालसाहित्य, कथा, पटकथा अशा विविधांगी लेखनाचा समावेश आहे. सईच्या मनात कायम एक निरागस मुल दडलेलं आहे. ते त्यांच्या लिखाणातुनही सतत डोकावत असतं. खरेतर सई हे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व. सईंनी नाटकाबरोबरच आकाशवाणी, दूरदर्शन, माहितीपट, आणि सिनेमा अशी सारीच माध्यम वापरली. आणि केवळ वापरलीच नाही, तर त्यावर आपली नाममुद्राही रेखली. एकटे अपत्य असलेल्या सईला माणसांमध्ये रमणे खूप आवडते, त्याचा प्रभाव त्यांच्या नाटक-सिनेमामध्येही दिसतो. शेजारी, सख्खे शेजारी, पुन्हा शेजारी, हम पंछी एक चाॅल के ही नाटके आणि कथा, चष्मेबद्दुर सारखे सिनेमे याची साक्ष आहेत.या सगळ्यातुन त्यांनी चाळीमध्ये राहणारा सामान्य माणुस उभा केला.
सईने लिहिलेली, दिग्दर्शित केलेली नाटके, सिनेमे हे हसत-खेळत जीवनाचे तत्वज्ञान सांगतात आणि मनावर गारुड करतात. आलबेल, जास्वंदी ही नाटके आणि स्पर्श, दिशा हे सिनेमे ही त्याची उत्कृष्ट उदाहरणे. सईंनी अनेक दूरदर्शन मालिकांचे दिग्दर्शनही केले आणि सई घराघरात जाऊन पोहोचल्या.
विजया मेहता आणि सई परांजपे हे दोन मनस्वी प्रवाह एकदा एकत्र आले, ते जास्वंदी नाटकाच्या निमित्ताने. जास्वंदीची संहिता सईंची होती आणि दिग्दर्शन विजयाबाईंचे.माणसांच्या अनाकलनीय मनोव्यापारांचा, इच्छा-वासनांचा आणि स्खलनाचा शोध घेत जाणारं हे नाटक मानवी महत्त्वाकांक्षेच्या बुडाशी असलेल्या क्रौर्याचं दर्शन घडवतं. एका सहजलयीत उलगडत जाणाऱ्या बारीकशा कथेतून आणि त्या कथेच्या पोटात असलेल्या नाट्यपूर्ण घडामोडींतून ही आशयसूत्रं समोर येत जातात. एक तरल, भावनाट्य उभं राहताना त्याच्यातला शोकात्म गाभा आपल्याला घेरून टाकतो. ही सईंच्या लेखणीची कमाल आहे आणि विजयाबाईंच्या दिग्दर्शनाचीही. दोघीही तेवढ्याच समर्थ.
हा एक अपवाद वगळता हे दोन कला प्रवाह आपापल्या वैशिष्ट्यांसह समांतर प्रवाहित होत राहिले.
विजयाबाईंनी नाटकाशिवाय सिनेमा हे माध्यम क्वचित वापरले. त्यांचे स्मृतीचित्रे, पार्टी हे सिनेमे प्रेक्षकांना आवडलेही, पण त्यांचे मन त्यात रमले नाही.
दोघींनीही आपला कला प्रवास आत्मचरित्राच्या रुपाने चाहत्यांसमोर पेश केला आहे. या दोघींचेही आत्मचरित्र म्हणजे कलाक्षेत्राच्या मन्वंतर काळातला दस्तावेज आहे.
दोघींनीही कलाकृतीतून ओढूनताणून कुठला संदेश देण्याचा प्रयत्न केला नाही. कलेसाठी कला हे तत्व दोघींनीही जपले. जीवापाड सांभाळले.कलाक्षेत्रातील आपल्या कामाने या दोघींनीही आपापले संप्रदाय निर्माण केले. संगीताच्या भाषेत सांगायचे तर आपली घराणी निर्माण केली. नाना पाटेकर, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, रविंद्र मंकणी हे तर मोठ्या अभिमानाने विजयाबाईंचे शिष्यत्व मिरवतात.
विजयाबाई आणि सईने आपल्या साधनेने उजळलेला हा कलादीप असाच तेवत राहावा, या आशेसह.

 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह